राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अकोला : जिल्ह्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ५५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात विविध स्तरांवर सर्वेक्षण करण्यात आले. महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात पाहणी केली असता, शाळेत कधीच न जाणारे अकोला जिल्ह्यासह इतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून १५ ते ३० जुलैदरम्यान मोहीम राबवल्या गेली. महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल ५५ मुले आढळून आले. त्यामध्ये अकोला जिल्हासह इतर जिल्ह्यातील २३ मुले आणि काही कारणाने अर्धवट शिक्षण घेणारे ३२ मुले आढळून आली. या सर्व मुलांना नियमित शाळेत प्रवेश देण्यात आला असून, आजही विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण २३ विद्यार्थी आढळून आले. आणि प्रवेश न घेतलेले, शिक्षण अर्धवट सोडलेले तसेच काही कारणांमुळे दीर्घकाळ शाळेत अनुपस्थित असलेल्या ३२ विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणातून जिल्ह्यात ५५ विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे निदर्शनास आले.
शाळाबाह्य होण्यामागे विविध कारणे असल्याचे दिसून येते. आर्थिक अडचणी, कुटुंबाचे स्थलांतर, पालकांची उदासीनता, कौटुंबिक परिस्थिती तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवश्यक मार्गदर्शन न मिळणे, अशी अनेक कारणे उघकीस आले. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांची नोंद करून न थांबता त्यांच्या शाळाबाह्य होण्याचे नेमके कारण शोधण्यावर भर देण्यात येत आहे.
शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. विद्यार्थ्यांचे वय, शैक्षणिक पातळी आणि पूर्वीचे शिक्षण लक्षात घेऊन त्यांना योग्य वर्गात प्रवेश देण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात येत आहे.
दरम्यान, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित शोध घेणे आणि त्यांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना नियमित शाळेत पाठवावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. ५५ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरले आहे.






