मोटारपंपाचे वीज कनेक्शन बंद, डिमांड भरूनही वीजपुरवठा नाही; महावितरणचा शेतकऱ्यांना झटका (File Photo : Electricity)
अकोला : शेतातील विहिरींवर मोटरपंपासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून महावितरणकडे डिमांड भरले. मात्र, दोन-तीन वर्षे उलटूनही वीजपुरवठा न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यातच डिमांडची रक्कम परत करण्याची पत्रे पाठवून नवीन वीज कनेक्शनऐवजी सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोप किसान सभेने केला.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने तसेच विविध शासकीय योजनांतून शेतात विहिरी खोदल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन दुबार पिके घेता यावीत, उत्पादन व उत्पन्न वाढावे, हा त्यामागील उद्देश होता. अनेक शेतकऱ्यांनी विहिरींसाठी कर्जही घेतले आहे. मात्र, मोटरपंपासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून महावितरणकडे डिमांड भरल्यानंतरही त्यांना वीजपुरवठा मिळालेला नाही. महावितरणकडून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना रक्कम परत घेण्याची पत्रे पाठविण्यात आली असून, रक्कम न घेणाऱ्यांना रजिस्टर्ड पोस्टाने चेकद्वारे परत केले जात असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.
नवीन वीज कनेक्शनऐवजी शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर मोटरपंप चालवावा, असा पर्याय दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, मुख्य सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारवजा निवेदन दिले आहे. महिनाभरानंतरही कार्यवाही न शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी केल्या, डिमांड भरली; मग दोन-तीन वर्षे वीज कनेक्शन न देता आता पैसे परत करून सोलर लावण्यास सांगणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे.
…अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
वीज कनेक्शन घ्यायचे की सोलर, हा निर्णय शेतकऱ्यांचा असला पाहिजे. महावितरणने डिमांड भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने वीजपुरवठा करावा. अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. नापिकी, अतिवृष्टी, बोगस बियाणे, शेतमालाला हमीभावाचा अभाव आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत असल्याची टीका किसान सभेने केली आहे.
कमिशनसाठी कनेक्शन बंद?
किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिनगारे, कार्याध्यक्ष अविनाश जरीले, गणपत मेंढे, अनिल चव्हाण, जिल्हा सचिव जगन चांभारे, पांडुरंग राऊत, सूरज बुरबुरे व पंकज पिसुडे यांनी सोलर कंपन्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन दिले जात असल्याचा आरोप केला.
‘सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे…’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचना