
अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला असल्याने १० दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दिवसेंदिवस काटेपूर्णा धरणातील पाणीसाठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. त्यामुळे सात दिवसाआड आठवे दिवशी सुरु असलेला पाणीपुरवठा ४ ऑक्टोबर २०२६ पासून १० दिवसआड ११ वे दिवशी करण्यात आला आहे.
जल प्रकल्पात यंदा अत्यल्प साठा
यंदा पावसाने सुरुवातीपासून दडी मारल्याने जलसाठ्यांमध्ये अपेक्षित जलसाठा संकलित झाला नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प निम्म्यापेक्षाही कमी भरले आहेत. मागीलवर्षी दोन ते तीनदा पाण्याचा विसर्ग कराव्या लागलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात यंदा मात्र केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट गडद झाले असून त्यावर उपाययोजनांसाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
…असा होतो पाणी पुरवठा
महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, केशवनगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगानगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ या ठिकाणांवरून शहरातील मूळ हद्दीत मलकापूर, शिवापूर, खडकी, शिवर, उमरी, गुडधी, न्यू तापडियानगर, हिंगणा, सोमठाणा, गीतानगर, गंगानगर, अयोध्यानगर, मेहरेनगर, गजानननगर, आश्रयनगर, डाबकी तसेच शिवनगर जलकुंभ, आश्रयनगर जलकुंभ, बस स्टॅण्ड जलकुंभ, शिवणी जलकुंभ येथून हद्दवाढ भागात पाणीपुरवठा केला जातो.
पाणी दहा दिवसांसाठी कुठे साठवावे?
मागील काही दिवसांपासून तब्बल दहा दिवसाआड अकराव्या दिवशी नळाला पाणी येत असून त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी दहा दिवसांसाठी कुठे साठवावे? असा प्रश्न पडला आहे. तरी जमेल तसे पाणी साठवून आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागवतो.
– प्रीती देशमुख, जुनेशहर, अकोला.