
मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार कशी? ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्यावर प्रश्न, १,२८८ शाळांकडे मैदान
Amravati News: गावखेड्यातील मुलांनी खेळात पुढे यावे, त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे, यासाठी सरकारकडून दरवर्षी क्रीडा विकासाच्या घोषणा केल्या जातात. मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची वस्तुस्थिती या घोषणांना आरसा दाखवणारी आहे. अमरावती जिल्ह्यातील तब्बल २८३ जिल्हा परिषद शाळांकडे स्वतःचे क्रीडांगणच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा शोधण्याची वेळ आली असून, त्यांच्या क्रीडा भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)
Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
जिल्ह्यात एकूण १,५७१ जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी १,२८८ शाळांकडे स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध आहे. मात्र उर्वरित २८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काची जागाच नाही. परिणामी क्रीडा तासिका असो वा शाळा सुटल्यानंतरचा खेळाचा वेळ, विद्यार्थ्यांनी खेळायचे तरी कुठे, असा प्रश्न शिक्षकांसमोरही उभा ठाकला आहे. क्रीडांगण नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या छोट्याशा ओट्यावर, अरुंद आवारात, शेजारील खाजगी जागेत अथवा गावातील सार्वजनिक मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागतो.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मोकळेपणाने धावणे, उड्या मारणे, सराव करणे किंवा मैदानी स्पर्धा घेणे जवळपास अशक्य होते. परिणामी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच आवश्यक क्रीडा सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांना मान्यता देताना विविध महत्त्वाच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, पिण्याचे पाणी, शौचालय तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय यासारख्या मुलभूत सुविधांची नियमित तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात शाळांकडे क्रीडांगण नसतानाही त्यांची तपासणी कशी होते आणि मान्यता कशी कायम राहते, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार
अंजनगाव सुर्जी तालुका क्रीडा सुविधांच्या बाबतीत आणखी गंभीर परिस्थितीत आहे. जिल्ह्यातील एकमेव असा तालुका, जिथे अद्याप हक्काचे तालुका क्रीडा संकुल उभे राहिलेले नाही, अशी स्थिती आहे. शहरालगत क्रीडा संकुलासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सातत्याने मागणी करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. एकीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रीडागुणांची क्षमता आणि दुसरीकडे मैदान व क्रीडा सुविधांचा अभाव, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या मुलांना मैदानावर धावण्याची संधीच मिळत नाही, ती मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कशी पोहोचणार? असा परखड सवाल आता पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उपस्थित होत आहे.