Photo Credit-Social Media
Maharashtra Assembly Election 2024: विदर्भातील बडनेरा मतदारसंघ कायम चर्चेत असतो, तो म्हणजे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यामुळे. बडनेराचे राजकारणही कायम या दोघांच्या भोवती फिरत असते. पण गेल्या काही महिन्यात याठिकाणी राजकीय उलाढालीही मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे बडनेरातून सलग तीन वेळा आमदार असलेले रवी राणा यांच्यासाठी यावेळीच निवडणूक सोपी नसणार असे बोलले जात होते. पण आता इथली परिस्थिती बददली आहे. २०१९ मध्ये ठाकरे गटाच्या प्रिती बंड यांनी रवी राणा यांना तगडी फाईट दिली होती. पण यावेळी शिवसेना ठाकरे गटाने सुनील खराटे यांना मैदानात उतरवल्यामुळेप प्रिती बंड यांनी बंड पुकारले असून त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रिती बंड या शिवसेनेचे दिवंगत आमदार आणि जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे गटाने प्रिती बंड यांची उमेदवारी नाकारून त्यांच्याजागी ठाकरे गटाचे प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रिती बंड यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या समर्थकांची बैठक झाली आणि अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९च्या निवडणुकीत प्रिती बंड यांनी रवी राणा यांच्याविरोधात निवडणूक लढवत ७५००० मते घेतली होती. यात त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. पण ठाकरे गटाने प्रिती बंड यांनी उमेदवारी नाकारल्याने ठाकरे गटातील एका गटात नाराजी होती. त्यामुळे प्रिती बंड यांच्या निवासस्थानी बैठक घेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. उद्या (२८ ऑक्टोबर) त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा: रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांनी लावली हजेरी
२०१९ च्या निवडणुकीत बडनेरा मतदारसंघातून रवी राणा यांच्याविरोधात प्रिती बंड यांनी निवडणूक लढवली होती. यात रवी राणा यांना ९०४६० मते पडली. तर प्रिती बंड यांना ७४९१९ मते मिळाली. दरम्यान, बडनेरा मतदारसंघातून सुनील खराटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रिती बंड यांच्या शेकडो समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. पक्षाने हा चुकीचा निर्णय़ घेतल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. इतकेच नव्हे तर पाच –सात वर्षांपूर्वी सुनील खराटे शिवसेनेत आले. त्यांना थेट जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारीही देण्यात आली. पण त्यांना ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडता आली नाही. कधी कुठले आंदोलन त्यांनी केले नाही, अशी टीकाही प्रिती बंड यांच्या समर्थकांनी केली.
प्रिती बंड म्हणाल्या, मला अगोदर कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासून पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटीही सुरू केल्या. पण आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी असा निर्णय घेतला. त्यामुळे कोणाशी बोलावे, हे सुचत नाहीये. गेल्या चार दशकांपासून बंड कुटुंबीय कायम ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहेत. आमच्याकडे पैसेही नाहीत, पण शिवसैनिकांनी पैसे जमवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक काय झाले हे माहिती नाही. तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक आहोत. येत्या एक-दोन दिवसांत आम्ही शांततेत विचार करून निर्णय घेऊ.
हेही वाचा: उमेदवारांनो, खर्च करताना जरा जपूनच; नाहीतर पदच येईल धोक्यात