Pune Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. पुण्याचे महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचा अर्ज आज भरण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत जनतेवर विश्वास दाखवला. भाजपच्या कथनी आणि करणीमधील फरक जनतेला समजला आहे. केवळ सत्तेचा उन्माद करून विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही संपविण्याचे काम सुरु आहे, असा आरोप शरद पवार यांनी येथे केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) आणि रवींद्र धंगेकर ( पुणे) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर रास्ता पेठेत सभा झाली. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सचिन आहीर, खासदार अॅड. वंदना चव्हाण, डॉ. विश्वजित कदम, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, अजित फाटक, आमदार अशोक पवार यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली
केंद्रामध्ये दहावर्षांपूर्वी सत्तेत येण्याअगोदर रोजगार, महागाई, शेतीबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचे नमूद करीत पवार यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘इंधन, गॅस सिलिंडरचे दर कमी करताहेत, दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणार अशी आश्वासने भाजपने दिली होती. पण, दहा वर्षांत पेट्रोलचे दर कमी तर झाले नाही. मात्र, ७१ रुपयांचे पेट्रोल १०६ रुपयांवर पोहोचले. ४१० रुपयांचा गॅस १ हजार ६१ रुपयांवर पोहोचला.
विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न
दोन कोटी रोजगार तर दूर तब्बल ८६ टक्के तरुण बेरोजगार झाला आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. शेतकर्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीत आंदोलन करावी लागत आहेत. त्यांच्यावरही लाठीहल्ले केले जात आहे. खेळांडूच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आपणच दिलेल्या आश्वासनांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीत विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही नष्ट करण्याचा सत्तेतून आलेला उन्माद सुरू आहे.
चार मंत्र्यांना कारागृहात टाकले
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर टीका केली म्हणून त्यांना कारागृहात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या चार मंत्र्यांना कारागृहात टाकले. पश्चिम बंगालमध्येही तृणमृलच्या मंत्र्यांना कारागृहात टाकले आहे. सत्ता लोकशाही जगवण्यासाठी असते ती मिटवण्याचे काम सुरू आहे. लोकशाही जगवण्यासाठी ही सत्ता उलथवण्यासाठी लोकांनी महाविकास आघडीला मतदान करावे.
कोण काय म्हणाले?
‘‘ सध्याचा देशाचा विकासाचा दर अभ्यासला तर २०४७ पर्यंत देश विकसित होऊ शकत नाही. त्यांच्या जाहीरनाम्यात मोदींचा फोटो ४८ वेळा वापरला आहे. लोक त्यांना विसरु नये म्हणून तो छापला गेला असावा’’- पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
‘‘ ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखण्याचे काम महाविकास आघाडी एकत्र येऊन करत आहोत. या तीन उमेदवारांसारखेच उमेदवार संसदेत पाठवायचे आहेत.’’ – बाळासाहेब थोरात (काॅंग्रेस नेते)
‘‘जीएसटीच्या माध्यमातून अगदी गोरगरीबांचे अन्न, कपडे, चपलांवर कर लावून पैसा गोळा करणारे केंद्र सरकार बड्या घोटाळेबाजांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कंपन्यांकडुन खंडणी गोळा करीत अाहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात समावून घेत अाहे.’’ – जयंत पाटील (राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष)