आषाढी वारी... जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेत विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. पंढरीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. ग्रामपंचायतींच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ केल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषी संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, प्रसाद काटकर, नरेंद्र खराडे, अधिकारी मीनाक्षीरी सककोत नुपमुख्य शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते. बीडीओ अमोल जाधव, अधीक्षक तांबोळी यांच्या कामकाजाचे सभेमध्ये कौतुक करण्यात आले.
पालखी मार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पूर्वी ८१ ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या ३ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत विभागामार्फत वारकरी स्वागत कमानी, पायांना आराम देणारे फुट मसाजर, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हँगर), शौचालये, स्नानगृहे, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन आणि स्वच्छता व्यवस्थेसह विविध सुविधांच्या कामांना सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून विकासकामांना गती दिल्याने सीईओ कुशल जैन यांचे कौतुक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनीही नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवल्याचे नमूद केले. पाण्याच्या टँकरची निविदा प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल जैन यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकरांचे कौतुक केले.
विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी सभागृहात मांडला. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून राऊत यांचे अभिनंदन केले.






