पुणे : औंध तसेच बाणेर या परिसरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. टोळीकडून सात गुन्हे उघडकीस आणत सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या वस्तू असा पाच लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
राकेश इंदू मच्छा (वय २१), सुरेश गुमानसिंग मावी (वय २०), प्यारसिंग भुल्ला अलावा (वय २०), बियानसिंग उर्फ भाया ठाकूरसिंग भुढड (वय २०), महेंद्रसिंग कलमसिंग डावर (वय २०), महिंदर धानसिंग अजनार (वय २०), कल्लू मकून देवका (वय २३, सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
औंध, बाणेर परिसरात घरफोडीचे गुन्हे घडले होते. नदीपात्राजवळ असलेल्या सोसायटीतील सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज चोरला होता. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, शेरु वाघवले, बाबा दांगडे व त्यांच्या पथकाने पहाटे या टोळीला सापळा लावून पकडले. चौकशीत चोरट्यांनी नदीपात्राजवळ असलेल्या सोसायटीतील बंद प्लॅटचे कुलुप तोडून घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल केली आहे.
फ्लॅट फोडून ऐवज पळविल्यानंतर टोळी रात्रभर नदीपात्रात थांबत होते. नदीपात्रात डास असल्याने चोरटे डासांपासून बचाव करण्यासाठी अंगाला चिखल तसेच मलम लावत असत. सकाळी चोरटे नदीपात्रातून बाहेर पडायचे. फुटपाथ व टेकडीवर ते दिवसभर राहत होते.