सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणातून भाजपला बाहेर ठेवून राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता (फोटो - नवराष्ट्र)
अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची निवड झाली. हा केवळ पदांचा विजय नसून जिल्ह्याच्या राजकारणातील भाजपच्या वर्चस्वाला दिलेला थेट शह मानला जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या सत्तासमीकरणात भाजपने घेतलेली आघाडी आणि राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या राजकीय अपेक्षांना बसलेला धक्का, याची सल या निवडीतून बाहेर पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेतील राजकीय गणितांचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काढण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सहकारातील ही निवडणूक केवळ संचालक मंडळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचे केंद्र बनली आहे.
या सत्तांतरातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने साधलेली राजकीय मोट. एकीकडे राज्यात महायुतीचे सरकार आणि दुसरीकडे साताऱ्यात महायुतीतील घटक पक्षांनीच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हा विरोधाभास अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. मग महायुतीचे राजकीय समीकरण जिल्ह्यात केवळ निवडणुकीपुरतेच आहे का? की स्थानिक नेतृत्वाला भाजपचे वाढते वर्चस्व मान्य नाही? या प्रश्नांची उत्तरे आगामी राजकारणातून मिळतील.
हा खरा आत्मपरीक्षणाचा मुद्दा
भाजपसाठी हा धक्का अधिक गंभीर ठरण्यामागे पक्षांतर्गत मतभेदांची चर्चाही कारणीभूत आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व एकाच दिशेने काम करत आहे का, की अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची राजकीय ताकद विभागली जात आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे. विरोधकांनी एकत्र येऊन डाव साधला, हे एकवेळ समजण्यासारखे आहे; मात्र स्वपक्षातील सर्व नेत्यांना एकत्र ठेवण्यात भाजपला यश आले का, हा खरा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे.
जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नाही. जिल्ह्यातील सहकार, साखर कारखाने, सोसायट्या, शेतकरी आणि ग्रामीण अर्थकारणावर तिचा प्रभाव आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा ताबा म्हणजे सहकाराच्या माध्यमातून राजकीय संपर्क आणि प्रभाव टिकवण्याची मोठी संधी. उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सहकारातील आपली पकड अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे, तर दीपक चव्हाण यांच्या निवडीने शिंदेसेनेनेही आपले राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे.
एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवून राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केवळ अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची लढाई जिंकलेली नाही, तर साताऱ्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत नवे समीकरण उभे केले आहे. भाजपला आता केवळ विरोधकांच्या डावपेचांना उत्तर देऊन चालणार नाही, तर स्वतःच्या घरातील विस्कटलेली घडीही सावरावी लागणार आहे. अन्यथा जिल्हा बँकेतील हा सत्तेचा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाली.
Ans: शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
Ans: महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवत बँकेची सत्ता मिळवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या स्थानिक राजकीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.






