डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी वरुन दिलीप वळसे पाटील आक्रमक झाले आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
मंचर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये वातावरण तापले आहे. उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
“पूर्वी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यात आपण गेली ३५ वर्षात केलेली कामे आपल्यासमोर आहेत . आता निवडून गेल्यानंतर तालुक्यातील आदिवासी भाग, सातगाव पठार, लोणी धामणी परिसर व शिरूर तालुक्यातील बारा गावांच्या पाट पाण्याचा प्रश्न आपण प्राधान्याने सोडवणार आहोत . तालुक्यातील डिंभे ( हुतात्मा बाबू गेणू जलसागर ) धरणाच्या बोगद्याला आपला कायम विरोध राहणार आहे. समोरच्या उमेदवाराने डिंभे धरणाच्या बोगद्याविषयी आपली स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडावी ” असे आवाहन आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर (ता . आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, “आंबेगाव तालुका बागायती झाला असला तरी देखील आदिवासी भागातील काही भाग, सातगाव पठार, लोणी धामणी परिसर व शिरूर तालुक्यातील बारा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. पुढील पाच वर्षात हा पाण्याचा प्रश्न आपण प्राधान्याने सोडवणार आहोत . प्रत्येक गावसाठी आपण अस्मिता भवन बांधणार आहोत याचा महिलांना उपयोग होईल. मंचर शहरातील क्रीडा संकुलनासाठी भरपूर निधी उपलब्ध झाला आहे. ते अधिक सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुक्यात चार ग्रामीण व एक उपजिल्हा रुग्णालय आहे. तळेघर, पाबळ, मलठण या गावांमध्ये ३० खाटांची रुग्णालये मंजूर झाली आहेत. तेथे तज्ञ डॉक्टर व आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.”
शिक्षणाच्या बाबतीत उमेदवार वळसे पाटील म्हणाले की, “पुढील काळात तालुक्यात मेडिकल कॉलेज उभारले जाणार आहे.काठापूर, पिंपळगाव, कवठे या ठिकाणी आपण वीजेची उपकेंद्रे उभारली. आता राज्य व केंद्र सरकारने सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे भारनियमन व जंगली प्राण्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. मंचर व घोडेगाव ही तालुक्यातल्या मोठ्या शहरांना अत्याधुनिक शहरे करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत”
हे देखील वाचा : राज ठाकरे अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली; राजकीय टीका टिप्पणी सुरुच
प्रस्तावित डिंभे धरणाच्या बोगद्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करताना उमेदवार वळसे पाटील म्हणाले,”समोरच्या उमेदवाराकडून माझे २०१८ मधिल बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखविले जात आहे . परंतु धरण भरल्यानंतर वरच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला आपली हरकत नाही. डिंभे धरणाला आपण कदापी बोगदा पाडू देणार नाही . समोरचे उमेदवार याविषयी काहीच बोलत नाहीत . त्यांनी बोगद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी . डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी आपण शंभर कोटी रुपयांचा निधी आणला आहे . डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याची आवश्यकताच राहणार नाही, असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले.