योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकांवर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
अकोला : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. अवघ्या दोन आठवड्यावर निवडणूक आल्यामुळे राजकारणला उधाण आले आहे. केंद्रातील अनेक नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. भाजपसह कॉंग्रेस पक्षाचे दिल्लीचे पक्षश्रेष्ठी राज्यामध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेत आहेत. योगी आदित्यनाथ यांची वाशिममध्ये सभा पार पडली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
भाजपचे पक्षश्रेष्ठी हे महाराष्ट्र दौऱ्य़ावर आले आहेत. फक्त भाजपचे नाही तर महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आहे. वाशीम येथे महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली. यावेळी आक्रमक पद्धतीने योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये लढत आहे. पण देश, धर्म, राष्ट्रीयता, समाजातील मूल्य आणि आदर्शांची चिंता नसणारी ही महा ‘अडाणी’ आघाडी आहे, अशा कडक शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीची अजब आश्वासनं! आमदार झालो तर मुलांची लग्न लावून देणार…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्र ही संतांची वीरांची आणि महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. देशात कुठेही राष्ट्रीय सन्मानाला ठेच पोहोचते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होते. देशाच्या स्वामिमान व सन्मानासाठी महाराजांचा संघर्ष होता. आजही त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.”
“महाराष्ट्रातील निवडणुक दोन आघाडींमध्ये होत आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुती आहे. महायुती ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, संपन्नेसाठी, विकासासाठी, परंपरा आणि गरिबांच्या कल्याणासाठी योजना आणणारे सरकार आहे. एक भारत श्रेष्ठ भारत यासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारत आहे. आता भारताकडे वाकड्या नजरेने बघितले तरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊन अर्धा पाकिस्तान भीतीने थरथरायला लागतो. चीनचे सैनिक माघारी जात आहेत, तर भारतीय सैनिक गस्त घालत असल्याचे चित्र आहे,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : राज ठाकरे अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली; राजकीय टीका टिप्पणी सुरुच
पुढे योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. मात्र, काँग्रेसने देश आणि राष्ट्रीयत्वासाठी कधीही इमानदारीने कार्य केले नाही. ही तीच काँग्रेस आहे, ज्या पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांचा निवडणुकीत पराभव होण्यासाठी प्रयत्न केले. भारताची सुरक्षा काँग्रेसनेच खराब केली. देशात एक वेळ अशी होती की, पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत होता, देशात घुसखोरी सुरू होती. देशात कुठेची बॉम्बस्फोट घडवून आणले जात होते. चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करीत होता. काँग्रेसच्या नेत्यांना मात्र संबंध बिघडण्याची काळजी होती, देशाची चिंता नव्हती,” अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.