फोटो - सोशल मीडिया
लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. त्यामुळे अनेक पक्षांतर देखील होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून भाजपला अनेक धक्के बसत असून अनेकांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला आहे. दरम्यान, भाजपला उदगीरमध्ये मोठा धक्का बसला आहे. उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
मागील अनेक दिवसांपासून माजी आमदार सुधाकर भालेराव हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. आज अखेर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भाजप कार्यालयामध्ये जाऊन भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे त्यांनी आधीच पक्षाची साथ सोडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपसाठी सुधाकर भालेराव यांचा राजीनामा धक्का मानला जात आहे. सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाची खेळी भाजपला महागात पडली आहे. उदगीरमधून शरद पवार गटाने सुधाकर भालेराव यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधामध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.