अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस 'पुणे बंद'
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. या भीषण अपघातात विमानाला आग लागल्याने अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर चार सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा आणि आज (२८ जानेवारी) शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. लाडक्या ‘दादां’ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासन आणि व्यापारी महासंघाने घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर, पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे.
बारामतीमधील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली आहे. पुण्यासोबतच राज्यातील इतर अनेक भागांतही स्थानिक प्रशासनाने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.






