फोटो - सोशल मीडिया
नागपूर : राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकांमुळे राजकारण रंगले आहे. विविध मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्प महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना देखील जाहीर करण्यात आली. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र त्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “लाडकी बहिण योजनेवरुन अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, कुठलीही फाईल वित्त विभागाकडून जाते,17 -18 लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही. दोन-अडीच कोटी महिलांना लाभ देताना अडचण कशी येते. गरीब महिला बाजारपेठेत खरेदी करतात तेव्हा बाजाराला फायदा होणार आहे, या महिला काही अॅमेझॉनमधून खरेदी करत नाहीत. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. गरीब महिलांवर अन्याय करण्याची ज्यांच्या मनात इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात. सोळा-सतरा लाख लोकांसाठी 44 हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला मात्र आता अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते आहे,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
महायुतीमध्ये जागावाटपासाठी भांडण नाहीत
पुढे त्यांनी राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मुनगंटीवार म्हणाले, “भाजप 5 वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपची भूमिका राहिली आहे. मात्र लोकांना भ्रमित करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे, आम्ही एकत्र काम करावे ही या मागची भूमिका आहे. विधानसभेसाठी जागा जेव्हा फायनल होतील तेव्हा सगळ्यांना माहीत पडेल. महायुतीमध्ये जागावाटप विस्तारासाठी भांडायचे नाही असे ठरवले आहे ,सूत्र लावल्यावर काही होणार नाही. पूर्व विदर्भात पक्षाच्या नेत्यांशी,आमदार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत,” असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.