मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठा फटका बसला. यावरुन भाजपची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या आरएसएसने आपल्या साप्ताहिकामध्ये भाजपवर टीका केली. लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करत अपेक्षित यश न आल्याची कारणं स्पष्टचं सांगितली आहेत. यामध्ये राज्यामध्ये अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले असल्यामुळे नुकसान झाले असल्याचा आरोप करण्यात आला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजकीय विषयावर भाष्य केले. आज अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अर्ज दाखल करण्यावेळी महायुतीमधील इतचर पक्षातील नेते अनुपस्थित होते. यावरुन टीका केली जात असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुती मधून त्यांना सगळ्यांच समर्थन आहे. मात्र महायुतींमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही, असे स्पष्ट मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
अजित पवार यांचा फायदा की नुकसान?
पुढे त्यांना RSS मधून अजित पवार यांच्या समावेशाबाबत करण्यात आलेल्या टीकेवर देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, अजित पवारांना घेऊन भाजपच कोणतही नुकसान नाही. उलट 2019 च्या तुलनेत भाजपची मतं वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे” असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएम वर संशय का घेत नाहीत? असा सवाल देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला.
मनसेसोबत चर्चा सुरु
त्यातबरोबर महायुतीमध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटी सामील झालेले मनसे देखील नाराज आहे. मनसेने विधानपरिषदेची कोकण पदवीधर मतदारसंघाची पूर्ण तयारी केली असताना त्यांना माघार घ्यावी लागली. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता. इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल,” असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले आहे.