Hingoli Politics: भाजपचा हिंगोली पॅटर्न: 'इनकमिंग' नेत्यांच्या पुनर्वसनाचा पेच सुटणार? निष्ठावंत विरुद्ध आयात संघर्षाची चर्चा
घुगे, बांगर, तांभाळे, दांडेगावकर प्रतीक्षेत
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव याच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या उर्वरित कार्यकाळाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे त्याना राज्यसभेवर संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाने सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन धनगर आणि हटकर समाजावर प्रभाव असलेल्या रामराव वडकुते यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. मागील दशकात भाजपमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजीराव माने आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांसारख्या नेत्यांचा प्रवेश झाला. मात्र लोकसभेची जागा वाटाघाटीत न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन न झाल्याने या तिन्ही नेत्यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले रामदास पाटील यांनी चार वर्षे मेहनत घेतली. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला, परंतु नंतर विधान परिषदेसाठीही सथी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला. या सर्व घटनामुळे भाजपमध्ये पुनर्वसनाचा मुद्दा संवेदनशील बनला होता, वसमत मतदारसधात भाजपाला बळकटी देण्याचे काम अॅड. शिवाजीराव जाधव यांनी केले. जिल्हाध्यक्षपद मिळूनही त्यांना लोकसभा उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र नंतर पक्षातून बाहेर पडले, तरी त्यांच्या काळात वसमत पंचायत समिती प्रथमच भाजपाच्या ताब्यात आली. ही बाब राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. सध्या भाजपमध्ये माजी आमदार गजानन घुगे, डॉ. प्रज्ञा सातव, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे, अतिश दांडेगावकर यांसारखे नेते राजकीय संधीच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे.
Pench Tiger Reserve : वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणार ‘AI’, कसं ते जाणून घ्या
जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यामध्ये औंढा नागनाथचे माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजकुमार झांजरी. वसमतचे श्रीकांत देशपांडे, शिवदास बोड्डेवार, हिंगोलीचे अॅड. प्रभाकर भाकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद चंबल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सतीश विडोळकर तसेच मोहन भागवत यांचे वर्गमित्र डॉ. पुंजाजीराव गाडे यांच्या नावांचीदेखील अधूनमधून चर्चा होत असते.
वसमत विधानसभेत आपल्या आक्रमक भाषेतून मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणाऱ्या उज्वलाताई सांभाळे मागील दीड दशकापासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करत आहेत. वसमत विधानसभा क्षेत्रात आता नवीन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने भाजपच्या जाणत्या नेतृत्वाकडून उज्वला ताई तांभाळे यांची कधी दखल घेतली जाईल याकडे ताईंच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांनी केला आहे. त्यांचा प्रवेश मागील पंधरवड्यात अपेक्षित होता, मात्र काही कारणाने तो लांबला, असे सांगितले जात आहे. या दाव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चाना उधाण आले आहे. एकूणच वडकुते यांच्या राज्यसभा निवडीने भाजपमध्ये राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून आता हिंगोली जिल्ह्यात पुढील संधी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लवकरच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू शकते, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. असे झाल्यास कळमनुरी मतदारसंघात भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






