
BJP's Operation Lotus fails in Ambernath; the Shinde faction of Shiv Sena and NCP will form the government
काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या पाठबळावर सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हालचालींमुळे भंग पावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले असून, त्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक पाठिंबा देत आहेत. यासोबतच एका अपक्ष नगरसेवकानेही शिवसेनेला साथ दिली आहे. या पाठिंब्यामुळे ३२ नगरसेवकांचा भक्कम गट तयार झाला असून, अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना–राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. या घडामोडींमुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींना नाट्यमय वळण मिळाले आहे. अंबरनाथमध्ये भाजपचे १६ तर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या भूमिकेतून भाजपने सुरुवातीला काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ पातळीवरून नाराजी व्यक्त झाल्यानंतर भाजपने (BJP) काँग्रेसचे १० नगरसेवक फोडत पुढची रणनीती आखली. यानंतर भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. या घडामोडींमुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, भाजपच्या या हालचालीनंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतही हालचालींना वेग आला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने डावपेच आखत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. शिवसेनेचे सर्व २७ नगरसेवक ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकत्र करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे २७, राष्ट्रवादीचे ४ आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठबळावर ३२ नगरसेवकांचा गट तयार करत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. या संदर्भात अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, श्रीकांत शिंदेंच्या या खेळीने भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेजी तुम्ही थेट ‘AIMIM’ वासी…”; अंबादास दानवेंची सडकून टीका
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष प्रतिष्ठेचा ठरला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर तर भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली.
या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर भाजपाचा झेंडा फडकावला. मात्र, जरी नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले तरी नगरपरिषदेत सर्वाधिक नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आल्याने संख्याबळाच्या लढतीत शिवसेनेचा वरचष्मा कायम आहे.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर येथील पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले असून ते संख्येने सर्वाधिक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय एका अपक्ष नगरसेवकानेही विजय मिळवला आहे. भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसचे १२ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसचे १२ पैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.