Buldhana Drought Relief Measures
खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणी परिस्थितीचा विचार करून कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आढळून आली आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मलकापूर, मेहकर, खामगाव, शेगाव, लोणार, देऊळगाव, राजा, सिंदखेड राजा, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश करण्यात आला.
शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या भागात नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसूल वसुलीस सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत यांचा समावेश आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांमध्ये शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टैंकर, शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व्यवस्था, जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेणे आणि पिण्याचे तसेच जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. “या संकटकाळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ देणे ही आमची प्राथमिकता आहे. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.






