
Buldhana Political Controversy
बुलढाणा: चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खाजगी सचिव असलेले विद्याधर महाले यांच्या जन्मदिवसानिमित्त बुलढाणा शहरात लावण्यात आलेल्या ‘कट आऊट’ फलकावरून झालेल्या वादाचे राजकीय पडसाद उमटत आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या या राड्यानंतर शहर पोलिस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलढाणा शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकातील गांधी भवन समोर शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आ. श्वेता महाले आणि विद्याधर महाले यांच्या प्रतिमेचे ‘कट आऊट’ लावले जात होते. दरम्यान, भाजप कार्यकत्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत माटले आहे. यावरून विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबतच्या ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर, प्रमोद गावंडे, मुन्ना बेडवाल, कौस्तुभ पाटील हे कट आऊट लावण्याचे काम करत होते.
गुन्हा दाखल असलेला विक्की आव्हाड हा बुलढाण्याचे शिवसेना आ. संजय गायकवाड यांचा समर्थक असल्याचे सांगितले जाते, या संबंधित तरी फोटोही समोर आलेले होते. मागील काही दिवसांपासून महायुतीत दिसणारे अंतर्गत सधर्ष आणि त्यातही आ. गायकवाड आणि आ. महाले यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळे था प्रकरणाला राजकीय पडसाद उमटत्त असून, राजकीय संघर्षाची चिन्हे दिसून येत आहे.