बीसीए, बीबीएमसाठी पुन्हा होणार सीईटी होणार (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्याने कॉलेजांतील जागा मोठ्या संख्येने रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. सीईटी सेलने २९ ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती. यात ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सीईटी सेलने त्याचा निकाल ४ जूनला जाहीर केला होता. मात्र, त्याचवेळी या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जवळपास १ लाख ५ हजार जागा आहेत. त्यातून निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केल्याने अनेक कॉलेजांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत.
दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी होती. सीईटीसाठी नोंदणी करू न शकल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले, याकडे प्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आता पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे.