हितेंद्र ठाकूर यांची शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडेसोबत युती
राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने वसई–विरार महापालिकेतून बविआची सत्ता उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ठाकूर कुटुंबाकडे असलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ठोस रणनीती आखली असून, विधानसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने भाजप कंबर कसून मैदानात उतरली आहे.
आपल्या बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या धनंजय गावडे यांना जवळ केले आहे. ठाकूर–गावडे यांची ही युती राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.
आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
एकीकडे भाजप ‘भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त वसई–विरार’चा नारा देत असताना, दुसरीकडे ठाकूर यांनी गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या गावडे यांच्याशी हातमिळवणी केल्याने टीकेची झोड उठली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का इतका तीव्र आहे की, सत्ता टिकवण्यासाठी ठाकूर कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याची चर्चा या युतीमुळे रंगली आहे.
आगामी वसई–विरार महापालिका निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती मर्यादित न राहता, आता ‘वर्चस्व विरुद्ध परिवर्तन’ या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. धनंजय गावडे यांची साथ ठाकूर यांना तारणार की त्यांच्या राजकीय अधोगतीला कारणीभूत ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या युतीमुळे वसई–विरारच्या राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
धनंजय गावडे यांची कारकीर्द वसई–विरारमध्ये सर्वपरिचित आहे. त्यांच्यावर बलात्कार, खंडणी यांसह तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. तुळींज पोलीस ठाण्यात बलात्कार, पिस्तुलाचा धाक दाखवणे तसेच अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याचा आरोपही त्यांच्यावर असून, आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच भाईंदर येथील एका विकासकाकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
याशिवाय आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. त्या कारवाईदरम्यान त्यांच्या वाहनातून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. नोटबंदीच्या काळात गावडे यांच्याकडे तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळून आल्या होत्या. या प्रकरणात आयकर विभाग आणि नालासोपारा गुन्हे शाखेने त्यांना रंगेहाथ पकडले होते.
मुंबईतील बहुचर्चित मनसुख हिरेन प्रकरणातही धनंजय गावडे यांचे नाव समोर आले होते. त्या वेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि गावडे यांच्यातील संबंधांवर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे त्यांच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती राज्यभर पोहोचली. गुन्हेगारी जगताशी संबंध आणि खंडणीखोर अशी प्रतिमा असतानाही हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना जवळ केल्याने, “महापालिका वाचवण्यासाठी दोन वादग्रस्त चेहरे एकत्र आले आहेत का?” असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.






