खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव (फोटो- सोशल मीडिया)
यशस्वीपणे पार पडला ‘शक्ती’ हा लष्करी-नागरी संयुक्त सराव
संयुक्त सरावात १६ नागरी संस्थांनी घेतला सहभाग
लष्करी जवानांसह ३५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी
पुणे: दक्षिणी कमांडच्या एमजी अँड जी एरियाच्या नेतृत्वाखाली खडकी लष्करी तळावरील डिग्गी रेंज येथे ८ व ९ जानेवारी रोजी ‘सांझा शक्ती’ हा लष्करी-नागरी संयुक्त सराव यशस्वीपणे पार पडला. या सरावातून आपत्कालीन आणि सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्करी व नागरी यंत्रणांमधील समन्वय आणि जलद प्रतिसाद क्षमतेचा प्रभावी अनुभव घेण्यात आला.
या सरावात भारतीय लष्करासह महाराष्ट्र पोलीस, फोर्स वन, अग्निशमन दल यांसह एकूण १६ नागरी संस्थांनी सहभाग घेतला. लष्करी जवानांसह ३५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी या सरावात सहभागी झाले होते. बदलत्या सुरक्षा परिस्थितीत एकमेकांशी समन्वय साधणे, वेळेत निर्णय घेणे आणि एकत्रितपणे कार्य करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
सरावादरम्यान विविध आपत्कालीन परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुकरण करण्यात आले. यामध्ये संवाद व्यवस्था, मानक कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रिया यांची चाचणी घेण्यात आली. संकटाच्या वेळी सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी अशा संयुक्त सरावांची गरज असल्याचे सहभागी संस्थांनी नमूद केले. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, जनरल ऑफिसर कमांडिंग, एमजी अँड जी एरिया यांनी नैसर्गिक आपत्ती, विशेषतः पूरपरिस्थितीत भारतीय लष्कराने बजावलेल्या मदतकार्याची माहिती दिली. तसेच माजी सैनिक व वीर नारींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी, आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना सहाय्य देण्यासाठी लष्कर आणि नागरी यंत्रणांमध्ये मजबूत समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सांझा शक्ती’सारख्या संयुक्त सरावांमुळे लष्करी-नागरी यंत्रणांची तयारी अधिक भक्कम होत असून, भविष्यातील आपत्कालीन आणि सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढत असल्याचे या सरावातून स्पष्ट झाले.






