Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
भोजनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, निवास व्यवस्था आणि दैनंदिन अडचणींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यामुळे प्रशासनाने आश्रमशाळेची केवळ कागदोपत्री माहिती न घेता प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. आश्रमशाळेतील अंतर्गत गटबाजीचा मुद्दाही यावेळी गंभीरपणे घेण्यात आला. शाळेतील अंतर्गत वाद बाजूला ठेवून येत्या पंधरा दिवसात सर्वांनी एकत्रितपणे कामकाज करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि सज्जड इशारा अपर आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील अंतर्गत कलहाला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
एका बाजूला अपर आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन करून त्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाचा संवेदनशील चेहरा दाखविला; तर दुसऱ्या बाजूला अर्धवट कटिंगचा फोटो बाहेर जाण्याचे गूढ आणि शाळेतील अंतर्गत गटबाजीचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे आता चौकशीत फोटोचे ‘कनेक्शन’ कुठे जाऊन थांबते आणि पंधरा दिवसांत शाळेतील वातावरण किती बदलते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अर्धमुंडण कटिंगच्या फोटोचे गूढ अद्याप कायम आहे. ३ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांचे केस कर्तन सुरू असतांना ट्रिमरची बॅटरी संपल्याने काही विद्यार्थ्यांची कटिंग अपूर्ण राहिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच अवस्थेतील विद्यार्थ्यांचा फोटो मोबाईलमधून बाहेर जाऊन थेट माध्यमांपर्यंत पोहोचल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
फोटो कोणी काढला? कोणाच्या मोबाईलमधून तो बाहेर गेला? तो माध्यमांपर्यंत नेमका कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे आता शोधण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन फोटो काढणाऱ्या तसेच प्रसारित करणाऱ्या व्यक्तीची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई झाल्यानंतर आता फोटो प्रसारित करणाऱ्या शिक्षकाची भूमिका काय होती? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.






