अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या...; प्रवाशांच्या अडचणी वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)
विशेष म्हणजे, एकीकडे बस वारंवार बंद पडणे, वेळापत्रकानुसार बस उपलब्ध न होणे आणि प्रवाशांची गैरसोय होणे, अशा तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने सुचवलेल्या भाडेवाढीनुसार, दोन किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सध्या आकारले जाणारे ६ रुपये भाडे वाढवून ८ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. १० ते १२ किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्याचे १७ रुपये भाडे १८ रुपये, तर २८ ते ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी २६ रुपयांऐवजी ३६ रुपये आणि ३८ ते ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी ३२ रुपयांऐवजी ४६ रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे.

या प्रस्तावानुसार, प्रवासाच्या अंतरानुसार भाड्यात १ रुपयापासून १४ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण बसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावासोबतच वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्याचेही प्रशासनाने सुचवले आहे. सध्याच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे इतर शहरांतील परिवहन सेवांच्या भाडेदरांशी तुलना करून वातानुकूलित बसचे दर कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार, अंतरानुसार वातानुकूलित बसच्या भाड्यात ५ ते ३५ रुपयांपर्यंत कपात होऊ शकते. यामुळे वातानुकूलित बसकडे अधिक प्रवासी आकर्षित होतील आणि या सेवेचा वापर वाढेल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वसाधारण बसचे भाडेदर २०१३ मध्ये, तर वातानुकूलित बसचे भाडेदर २०१६ मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर भाडेदरात बदल करण्यात आलेला नसल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
दरम्यानच्या काळात डिझेलचे दर, विद्युत बससाठी लागणारा खर्च तसेच बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी परिवहन सेवा चालवण्याचा आर्थिक भार वाढल्याने भाडेदरांचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेत डिझेलवर चालणाऱ्या ७४ आणि विद्युतचलित ५७ अशा एकूण १३१ बस आहेत. या बस शहरांतर्गत मार्गांवर तसेच ठाणे आणि मुंबईच्या दिशेने धावतात. शहरातील दैनंदिन प्रवासासाठी अनेक नागरिक या बससेवेवर अवलंबून आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून परिवहन सेवेच्या दर्जाबाबत तक्रारी पुढे येत आहेत. बसची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे बस वारंवार बंद पडत असल्याचे प्रकार घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्यापूर्वी बसची नियमित उपलब्धता, वेळापत्रकाचे पालन, देखभाल-दुरुस्ती आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने खर्चवाढीचे कारण दिले असले, तरी त्याचवेळी परिवहन सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे.
यापूर्वी २०२२ मध्येही भाडेवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यात आला होता; मात्र तो फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा एकदा भाडेदरांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण बसच्या प्रवाशांवर आर्थिक भार टाकणाऱ्या या प्रस्तावाला महासभा मंजुरी देणार की प्रवाशांच्या अडचणींचा विचार करून वेगळा निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, हा भाडेवाढीचा आणि भाडेकपातीचा प्रस्ताव आहे. महासभेची मंजुरी मिळून अधिकृत निर्णय होईपर्यंत प्रस्तावित दर लागू झाल्याचे समजू नये.






