
Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
या उपक्रमाची माहिती शिक्षकांनी पालकांना दिली असली, तरी अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. खान अकादमीच्या संकेतस्थळावरील प्रक्रिया क्लिष्ट असल्याने ग्रामीण पालकांना ती समजून घेण्यातही अडचणी येत असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. या समस्यांचा विचार न करता उपक्रमाच्या पूर्ततेची सक्ती करून शिक्षकांना जबाबदार धरले जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
यासंदर्भात केंद्रप्रमुख निमगडे यांना विचारणा केली असता, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ दाखविणे गरजेचे आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाचाच उपक्रम आहे. ज्या मुख्याध्यापकांनी यासंदर्भात काहीच काम केले नाही, त्यांना नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय वेळेनंतर घरी व्हिडिओ पाहणे अपेक्षित असताना, ते शाळेत शिक्षकांच्या मोबाइलवरून दाखविण्याची सक्ती केली जात असल्याने शिक्षकांचा आक्षेप आहे. नियमित अध्यापन, प्रशिक्षण, बीएलओची कामे आणि पोर्टलवरील नोंदी यांमुळे शिक्षकांवर आधीच कामाचा ताण आहे. त्यात या उपक्रमाची भर पडल्याने अध्यापनासाठी वेळ कसा द्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोठी बातमी ! राज्यात अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी आता बंद; फ्लॅट खरेदीतील फसवणूक टळणार
डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत खान अकादमीच्या माध्यमातून शैक्षणिक वेळेत शिक्षकांवर नवीन अशैक्षणिक काम लादले जात आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवायचे की जवळ आणायचे, असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाची सक्ती करू नये, यासंदर्भात शासनाला निवेदन पाठविले आहे. मुख्याध्यापकांना नोटीस बजावणे चुकीचे आहे. – हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, प्राथमिक शिक्षक समिती