
Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यात ‘मिशन सुधार’चा दणका; तब्बल 10 हजारांवर शिधापत्रिका अपात्र, रेशनचा धान्य पुरवठा होणार बंद
१ ऑगस्ट रोजी गुराखी हिरामण साखरे (रा. सामदा) यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी नामदेव कुकडे (रा. केरोडा) यांच्यावर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ते जखमी झाले. १२ सप्टेंबर रोजी शेतकरी अशोक ठाकरे (रा. व्याहाड बुज) यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी वासुदेव वाकुडकर (रा. निलसनी) यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखी वाढले असतानाच सोमवारी सायंकाळी तरुण गुराखी हेमंत अशोक भुरसे (रा. सामदा बुज) यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. (फोटो सौजन्य: Pinterest)
सलग घडलेल्या या घटनांमुळे सावली तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील बहुतांश शेतकरी पशुपालनावर अवलंबून आहेत. गुरे चारण्यासाठी शेतकरी व गुराख्यांना जंगलालगतच्या परिसरात जावे लागते. मात्र, वाघाचा वाढता वावर आणि मानवी हल्ल्यांच्या घटनांमुळे गुरे चारण्यासाठी बाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. तिन्ही गुराखी असल्याने गावकऱ्यांसमोर आता गुरे चारण्याचा प्रश्नही गंभीरपणे उभा राहिला आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावली तालुक्यात मागील एक महिन्यात वाघाच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या असून, तिन्ही घटनांमध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघांच्या बंदोबस्तासोबतच गुरे चारण्यासाठी वनविभागाने सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि नरभक्षी वाधाला त्वरित जेरबंद करावे. – भाऊराव कोठारे, सामाजिक कार्यकर्ता, कापसी
सामदा बूज परिसरातील भ्रमती करणाऱ्या वाघानच तिन्ही बळी घेतले याची पुष्टी करण्यात आली. वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून प्रस्तावाला मंजूरी मिळताच वाघ जेरबंद करण्यात येईल. दरम्यान जंगल परिसरात वनविभागाची टीम वाघाच्या मागावर असून शेतकरी व गुराख्यानी जंगल परिसरात जातांना योग्य ती काळजी घ्यावी. वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे. – राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर