IIT Bombay प्रकरणात साहिलच्या वडिलांचा मोठा आरोप; ‘माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं’
IIT Bombay Student Suicide : IIT Bombay विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि IIT बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्या अटकेची मागणी केली आहे. FIRमध्ये दाखल करण्यात आलेल्या कलमांनुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडे आहे.
रविंद्र वाकोडे यांनी आपल्या मुलावर मागील काही काळापासून मानसिक त्रास आणि जातीय स्वरूपाचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. ‘माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं होतं. दुल्ला आणि केदारे यांना अटक झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. साहिलला जातीवाचक वक्तव्यं केली जात होती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असाही आरोप त्यांनी केला.
रविंद्र वाकोडे यांच्या म्हणण्यानुसार, “13 सप्टेंबरला ते साहिलला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी साहिलने आपल्यासोबत झालेल्या कथित त्रासाबाबत माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला. ‘मी वरच्या जातीचा आणि तू खालच्या जातीचा’ अशा प्रकारची वक्तव्यं करून साहिलला डिवचलं जात होतं,” असा आरोप त्यांनी केला.
या आरोपांवर IIT बॉम्बेने यापूर्वी आक्षेप घेतला आहे. संस्थेने साहिलने जातीय छळाबाबत SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासात स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.
18 सप्टेंबरला साहिलच्या परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ChatGPTचा वापर केल्याचा दावा IIT बॉम्बेने केला होता. त्यानंतर त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याचं वृत्त आहे. हे फुटेज आता तपासाचा महत्त्वाचा भाग ठरलं आहे.
IIT बॉम्बेने सुरुवातीच्या निवेदनातील काही बाबींवर नंतर स्पष्टीकरण देत घटनेची परिस्थिती तपासाधीन असल्याचं सांगितलं आहे. प्रा. दुल्ला यांना डीन पदावरून हटवण्यात आलं असून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
साहिलने कॉपी केल्याच्या दाव्यावरही त्याच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज सार्वजनिक करून नेमकं काय घडलं, हे स्पष्ट करावं, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, साहिलच्या वडिलांच्या तक्रारीनंतर प्रा. दुल्ला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांच करत असून, आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






