
Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
पूर्वी पावसाळ्यात शेतातून वाहून जाणारे पाणी बोडीत साठविले जात असे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेताबाहेर वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरण्यास मदत होत होती. यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल तसेच इतर जलस्रोतांची भूजल पातळी टिकून राहण्यास हातभार लागत होता. जिल्ह्यात विशेषतः भात शेतीसाठी या पाण्याचा उपयोग केला जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणाचा काही प्रमाणात सामना करता येत होता. याच बोडीमध्ये मत्स्यपालनही केल्या जात असे. गावोगावी पूर्वी जलसंधारणाची कामे स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पावसाच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन केली जात.
शेतातील बोडी, गाव तलाव, नाले, बांध आणि विहिरी यांची एकमेकांना पूरक अशी व्यवस्था होती. मात्र कालांतराने पारंपरिक पद्धतींकडे दुर्लक्ष झाले. शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी बोड्या बुजविण्यात आल्या. त्यामुळे पावसाचे पाणी साठविण्याची नैसर्गिक क्षमता कमी झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया कमी झाल्यास भूजल पातळीवर त्याचा थेट परिणाम होतो. पावसाळ्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडला तरी पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते आणि उन्हाळ्यात पुन्हा पाण्याची टंचाई जाणवते. अशा परिस्थितीत पारंपरिक बोड्यांचे पुनरुज्जीवन केल्यास पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविणे शक्य होऊ शकते.
गावपातळीवर अस्तित्वात असलेल्या जुन्या बोड्यांचा सर्वेक्षण करून त्यांची नोंद करणे, गाळ काढणे, खोली वाढविणे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करणे तसेच गरजेनुसार दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत, कृषी विभाग, जलसंधारण विभाग आणि स्थानिक शेतकरी यांच्या समन्वयातून अशा बोड्यांचे पुनरुज्जीवन केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोडी है महत्वाचे पाण्याचे साधन आहे. मात्र दिवसेंदिवस बोडीची वाटणी करून त्यात शेती करण्यात येत आहे. आजही अनेक गावांमध्ये काही बोड्या असल्यास शेतक-यांनी त्यातील गाळ काढून, उपसा करून पुनरूज्जीवन करावे, जलसंधारणासह शेतीसाठी आधार होईल. – शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर