
Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून काही विद्यार्थी दुचाकीवरून वेगाने जात असल्याने पादचारी आणि अन्य वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. ट्रिपल सीट प्रवास करताना दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असतानाही काही जणांकडून निष्काळजीपणे वाहन चालविले जात असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारात एका युवकाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रैक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक नियमांच्या उल्लंघनात आणखी एक बाब समोर येत आहे. काही दुचाकींवर अधिकृत नंबरप्लेटऐवजी फोटो किंवा चित्र लावण्यात आल्याचे दिसून येते. वाहनांची ओळख स्पष्ट होण्यासाठी नंबरप्लेट महत्त्वाची असताना अशा प्रकारांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांनीही या परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. केवळ वाहतुकीचे नियम सांगून चालणार नसून, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही आवश्यक आहे. विनापरवाना वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास, नियमबाह्य नंबरप्लेट आणि स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात नियमित तपासणी व कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिस आणि वाहतूक विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच, पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नयेत.- नितीन चिंचोलकर, ठाणेदार, राजुरा