Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी
तालुक्यातील बहुतांश गावांना सामूहिक वनहक्क दावे मंजूर झाले आहेत. या अधिकारांच्या माध्यमातून जंगलाचे संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन तसेच जंगल परिसरात रोजगारनिर्मितीची कामे करता यावीत, यासाठी शासनाने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ग्रामसभेला मनरेगाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नागभीड तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून जंगलातील आवश्यक कामांचे नियोजन केले जाते. त्यानंतर ग्रामसभेने मंजूर केलेल्या कामांची चिन्हांकित यादी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व पंचायत समितीकडे सादर केली जाते. (फोटो सौजन्य – AI Created)
परिपत्रकात यंत्रणा निवडण्याचे स्वातंत्र्य ग्रामसभेला देण्यात आले आहे. ग्रामसभेने नियोजित केलेली कामे स्वतः ग्रामसभेमार्फत राबवायची की ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा इतर शासकीय विभागांमार्फत करून घ्यायची, याचा निर्णय ग्रामसभेच्या मान्यतेने कार्यकारी मंडळ घेईल. ग्रामसभेने निश्चित केलेल्या कामांच्या यादीवर ग्रा.पं.ने १५ दिवसाच्या आत ठराव कारावा.
सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभेने ग्रामसभेमध्ये कामांना मंजुरी देऊन ठरावसंहीत ग्रामपंचायतला दिले आहे. तसा ठराव बनवून ग्रामपंचायतने तहसीलदार यांना द्यावे. आणि तसे पत्र काढून तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कडून ठराव मागावे. परंतु ग्रामसभेच्या कामाची यादी आणि ठराव, ग्रामसभांना परत करणे म्हणजे एक प्रकारची ग्रामसभांची अवहेलना आहे. याची संपूर्ण चौकशी करून तहसीलदारांवर उचित कारवाही करण्यात यावी. – भोजराज नवघडे, समन्व्यक रिवॉईस संस्था
मनरेगा परिपत्रकासाठी ग्रामसभेची ऑनलाईन परवानगी अपलोड करावी लागते. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगी मागीतली आहे. परवानगी प्राप्त होताच ऑनलाईन अपलोड केल्या जाईल व कामे सुरू केल्या जातील. ग्रामपंचायतीची कोणतीही अडवणूक करण्यात आलेली नाही. – महेश देशमुख, तहसीलदार, नागभीड
या संपूर्ण प्रकरणावर नागभीड तहसीलदारांनी तातडीने तोडगा काढून शासन परिपत्रकानुसार ग्रामसभांच्या अधिकारांचा सन्मान करावा आणि निर्माण झालेला प्रशासकीय अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा एकत्र येऊन आंदोलन छेडतील व पुढील आंदोलनाची दिशा निश्वित करतील, असा इशाराही ग्रामसभा प्रतिनिधींनी दिला आहे.






