Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई
जिल्ह्यात २२०० अंगणवाड्या आहेत. त्यात ४४०० अंगणवाडीसेविका आणि मदतनिस कार्यरत आहे. काही अंगणवाड्या स्वमालकीच्या, तर काही किरायाच्या घरात, समाजमंदिरात भरविल्या जात आहे. अलीकडेच महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्या बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. मधल्या काळात अंगणवाडीसेविकांना कामकाज करता यावे, यासाठी मोबाइल देण्यात आले. मुलांची हजेरी, आहार नोंदणी, लसीकरण, सर्वेक्षण, गर्भवती महिला, स्तनदा मातांची नोंदणी, शून्य ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे यासह अन्य कामांसाठी अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले.
सुरुवातील मोबाइल कार्यान्वित करण्यासाठी वर्षभरासाठी एक हजार रुपयांचे रिचार्ज मारून देण्यात आले होते. मात्र, देण्यात आलेले मोबाइल हलक्या कंपनीचे होते. त्यामुळे काही महिन्यांतच मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. कामेच होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीसेविकांनी सर्व मोबाइल महिला व बालकल्याण विभागाकडे परत दिले. त्यानंतर विभागाने एका मोठ्या कंपनीचे मोबाइल विकत घेऊन अंगणवाडीसेविकांना देण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडीसेविकांचे काम सोपे झाले.
कामकाज सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीसेविकांना रिचार्ज करून देण्यात आले होते. त्यानंतर रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होते. मात्र, गत काही महिन्यांपासून रिचार्जचे पैसेच खात्यावर जमा होत नसल्याचे अंगणवाडीसेविकांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये तब्बल १० महिन्यांचे, तर आता जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांचे रिचार्जचे पैसे खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे या कालावधीत अंगणवाडीसेविकांना स्वतः रिचार्ज करून कामे करावी लागत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिलांचे म्हणणे आहे.
अंगणवाडी सेविकांना तीन, तीन महिन्यांचे रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून देण्यात येत आहे. काहींच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास त्यांनी प्रकल्प कार्यालयात कळवावे.- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प.
अंगणवाडी सेविकांवर कामाचा व्याप आहे. कामासाठी त्यांना मोबाइल देण्यात आले. मात्र, रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यास राज्य शासन दिरंगाई करीत आहे. कोरोना काळात एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे कबूल करण्यात आले. मात्र, तेही त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जमा करण्यात आले नाही. – प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना






