साठेबाजांवर कडक नजर! जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये गॅस सिलिंडरची झाडाझडती (Photo Credit- X)
एकीकडे जिल्हाभरात गॅसवरून हाहाकार माजलेला असताना एकही गैरप्रकार आढळून नये, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गॅस एजन्सीजनंतर आज रविवार, १५ पासून जिल्ह्यातील हॉटेल्समधील गॅस सिलिंडरची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅसचा साठा मुबलक असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, एजन्सीवर गर्दा करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात असले तरी वास्तवात नागरिकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाल्याने गॅससाठी गोंधळ उडत आहे. प्रसंगी सिलिंडर मिळवण्यासाठी बाचाबाची, मारामारीचे प्रकारही घडत आहेत. साठा असूनही दिला जात नाही, दर वाढवून दिले जातात, अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरु आहे मात्र, प्रशासनाच्या तपासणीत काहीही आढळले नसल्याने नेमके चित्र काय आहे, यावर प्रश्न निर्माण होत आहे.
एलपीजी गॅस सिलिंडर असूनही न देणे, साठेबाजी करणे, दर वाढवणे किंवा इतर गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील गॅस एजन्सीची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून तब्बल ५४ एजन्सी, १९ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. आता आज रविवार, १५ पासून जिल्ह्यातील हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असून या मोहिमेत काही हाती लागेल का ? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज (शनिवारी) सिल्लोड आणि वैजापूर येथील काही हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यात काही हॉटेलमध्ये कर्मशियल गॅस सिलिंडरचा स्टॉक आढळून आला मात्र तो जुना स्टॉक असल्याचे हॉटेल चालकाने सांगितल्याने कारवाई केली नाही.
८८ पथकाकडून गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्यात आल्या, मात्र कुठेही काहीही गैरप्रकार आढळले नाहीत. त्यामुळे कोणावर कारवाई करावी हा प्रश्न आहे. नागरिकांनी देखील पुरवठ्याबद्दल तक्रारी केलेल्या नाहीत. फुलंब्री तालुक्यात दोन एजन्सीबाबत तक्रारी आल्या होत्या, मात्र तपासणीत त्यात तथ्य आढळले नाही. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास किया याविषयी काही माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, आम्ही कारवाई करू.
– प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी
आजपासून केल्या जाणाऱ्या हॉटेल तपासणीत परवानगीपेक्षा अधिकचा स्टॉक करणे, जास्तीचा स्टॉक असेल तर तो कुठून आणला, तसेच व्यावसायिकऐवजी घरगुती सिलिंडर वापरले जातेय का ? याची तपासणी होणार आहे. यात दोषी आढळल्यास जागेवरच गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे.
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक






