संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई!
त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागांत पथकांनी भेटी देऊन थकबाकीदारांवर कारवाई केली. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली, तर अनेकांनी तत्काळ थकबाकी भरून पुढील कारवाई टाळली. महापालिका प्रशासनाने पुढील काळातही अशाच स्वरूपाच्या मोहिमा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी तातडीने कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत झोन ८ ने सर्वाधिक ३६.७५ लाख रुपयांची वसुली केली, झोन ५ मध्ये १९.०९ लाख, झोन ६ मध्ये १३.६५ लाख आणि झोन १ मध्ये १३.६० लाख रुपयांचा ३ कर जमा झाला. मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने वसुलीला गती मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. झोननिहाय कारवाईत झोन १ मध्ये एक, झोन २ मध्ये एक, झोन ३ मध्ये दोन, झोन ४ मध्ये तीन, झोन ५ मध्ये सहा, झोन ६ मध्ये तीन, झोन ७ मध्ये तीन, झोन ८ मध्ये एक आणि झोन १० मध्ये तीन मालमत्ता सील करण्यात आल्या. झोन ३ मधील दोन मालमत्तांवर तब्बल २५.५४ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक झोनमध्ये १५ ते २० प्रमुख थकबाकीदारांची निवड करून त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे. थकबाकी कायम ठेवल्यास सीलसह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.






