चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
Amravati News: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी चाऱ्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना चारा उत्पादनाकरिता अनुदान देण्याची मागणी माजी आ. बच्चू कडू यांनी सरकारकडे केली होती. त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने सरकारने १४ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, २०२६-२७ या वर्षासाठी चारा बियाणे आणि रोपांच्या वितरणाच्या अटींमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – AI)
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्यमशीलता योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्रात चारा उत्पादनासाठी ४ हजार रुपयांपर्यंतची चारा बियाणे व रोपे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. यापूर्वी या योजनेचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान ३ ते ४ पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, नव्या शासन निर्णयानुसार २०२६-२७या वर्षासाठी या अटीत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पशुधनाची निर्धारित अट पूर्ण करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेअंतर्गत शेतकरी गटांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत २० हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे आणि रोपे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी गटांना सामूहिक पद्धतीने चारा उत्पादन करता येणार आहे. मात्र, सार्वजनिक जमिनीवर चारा उत्पादन करणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला स्वतंत्रपणे अनुदान देण्याबाबत शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी केवळ चारा छावण्यांवर अवलंबून न राहता, जमीन आणि पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कडू यांनी केली होती. चारा उत्पादन वाढल्यास पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ वेळेत पोहोचविणे आणि चारा उत्पादन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही प्रशासनाची जबाबदारी राहणार आहे.
अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा; आता इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने चारा बियाणे वितरणाच्या नियमात आणखी एक महत्त्वाची सवलत दिली आहे. चारा उत्पादनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकरी किंवा शेतकरी गटाला, प्रथमच योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अन्य पात्र अर्जदार उपलब्ध नसल्यास, एकापेक्षा अधिक वेळा लाभ देता येणार आहे. मात्र, संबंधित शेतकरी किंवा शेतकरी गटाकडे चारा उत्पादनासाठी पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित उपायुक्तांकडून करून घेणे आवश्यक राहणार आहे. ही सवलत केवळ २०२६-२७ या वर्षासाठी लागू असेल.






