जयदीप आपटेला पोलिस कोठडी (फोटो- टीम नवराष्ट्र)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल रात्री मुख्य आरोपी जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतला. तब्बल ११ दिवसानंतर पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली. त्यानंतर आरोपी जयदीप आपटेला मालवण कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयदीप आपटे याला मालवणच्या कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायधीश महेश देवकते यांच्या खंडपीठासमोर पार पडली. वकील तुषार भनगे यांनी सरकारची बाजू मांडली. तर वकील गणेश सोहनी यांनी आरोपी जयदीप आपटेची बाजू मांडली. दरम्यान दोंघांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्याना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याआधी अटक करण्यात आलेला आरोपी चेतन पाटील याची आज कोठडी संपत होती. त्याला देखील आज कोर्टात हजर केल्यानंतर १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. यानंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा शिल्पकार काही राजकारण्यांचा जवळ असल्यामुळे तो आता हाती लागणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. पोलीसांच्या अथक प्रत्यनानंतर अखेर काल (दि.04) शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी पथक तयार करत आपटेचा शोध सुरु ठेवला होता. कल्याणमध्ये जयदीप आपटे त्याच्या आई व बायकोला भेटायला आला. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधीच…”
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयदीप आपटे याच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणाला क्षमा नाही. कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्ही आधीच सांगितलं की त्याच्यावर कारवाई होईल. या प्रकरण विरोधक जे काही अफवा पसरवत होते त्यांनाही मोठी चपराक आम्ही दिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आमचं सर्वांना सांगणं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. राजकोटमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पण यावरुन राजकारण करणं हे त्याहूनही मोठे दुर्दैव आहे. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी रुबाबामध्ये उभा करणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.