
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान (Photo Credit- X)
रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती. या दबावामुळे चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. मात्र, महिलांशी दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी (अशोक खरात) त्यांचे निकटचे संबंध असल्याचे किंवा त्यांनी त्याला गुरुस्थानी मानल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत पीडित महिलांना न्याय मिळणे कठीण झाले असते. ही बाब त्यांनीही मान्य केली आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.”
🕦 11.35am | 22-3-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/iCCf2QoQ2l — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2026
अशोक खरात प्रकरणावर बोलताना मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या कथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असूच शकत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी अशोक खरातला त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस यांना जे काही करावं लागेल ते करतील. पण महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा सहभाग असेल, तर त्यांच्यावरही कारवाई होईल. पण अशोक खरातला कोणी फक्त भेटलं म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
त्यांनी असेही सांगितले की, सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये महिला एकदम पुढे येत नाहीत. त्यामुळे पिडीत महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीप्रमाणात महिला आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहेत. तसेच या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरू असून मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या अडचणीत सापडला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दर्जा राज्यमंत्रिपदाचा असल्याने, आता हे रिक्त पद कोणाकडे जाते आणि खरात प्रकरणाचा तपास कोणत्या वळणावर पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.