Ashok Kharat Case : खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा...' (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण बाहेर येताच अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच या महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करताना दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, ”कथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल. अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. पण राजकीय व्यक्तींचे फोटो कोणसोबतही असू शकतात. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन खरातसाठी 40 किलोमीटरची पाण्याची लाईन मंजूर केली, त्यांना काय शिक्षा द्यावी? मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे या मुद्द्यावर शांत का बसतात? आम्हाला या सगळ्याचे राजकारण करायचे नाही”.
हेदेखील वाचा : Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप
दरम्यान, या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरु आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
वरिष्ठ स्तरावर तपास सुरु
ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला कल्पना होती की, सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये महिला एकदम पुढे येत नाहीत. त्यामुळे पीडित महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही प्रमाणात महिला याला प्रतिसाद देत आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरु आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे’.
खरातला आधीच लागली होती अटकेची चाहूल
दुसरीकडे, अशोक खरात याला 18 मार्चच्या पहाटे नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. पण, अटकेची चाहूल लागताच खरातने शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे.






