File Photo : Winter
चंद्रपूर : हवामान बदलताच मुले सर्वात जास्त आजारी पडू लागतात. विशेष करून पावसाळा, हिवाळ्याला सुरुवात होताच, तेव्हा आजारांचा प्रादुर्भाव जास्त वेगाने पसरतो. तेव्हा हवामान बदलते तेव्हा मुलांना सामान्यतः विषाणूजन्य ताप, सर्दी-खोकला, संसर्ग आणि इतर संसर्गाचा त्रास व्हायला लागतो. दसऱ्यानंतर थंडी वाढायला लागल्याने बालके व लहान मुलांना ताप, सर्दी- खोकल्याचा त्रास वाढल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : रेल्वेच्या ‘ऑपरेशन अमानत’ला चांगलं यश; तब्बल 4 कोटी 60 लाखांच्या वस्तू मूळ मालकांना परत
मुला-मुलींच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून, पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे असे घडते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांची आणि त्यांच्या जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी चांगला असला तरी वाढत्या थंडीच्या सुरुवातीला लहान बालकांना एकाचवेळी बदललेले वातावरण सूट होत नाही. परिणामी, सर्दी-खोकल्याचा त्रास अधिकच वाढतो. त्यामुळे अंगावर काढण्यापेक्षा नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे.
वातावरणात आणखी गारवा वाढणार असून, बालकांसह वृद्धांच्याही आरोग्याची काळजी आवश्यक आहे. लहान मुलांना पूर्ण झोप मिळणे खूप गरजेचे आहे. बारा वर्षांखालील मुलांना किमान 9 तास झोपावे. झोप पूर्ण झाल्याने मुले ताजीतवानी राहून ऊजदिखील मिळते. पूर्ण झोप मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि ते कमी आजारी पडतात.
संतुलित आहार आवश्यक
मुलांना निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आहारात सर्व पोषकतत्त्वांचा समतोल असायला हवा. मुलांना प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळायला हवे. फळे, भाज्या, दूध, कडधान्ये आणि अंडी यांसारख्या पौष्टिक आहारामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. संतुलित आहार घेतल्यास मुले कमी आजारी पडतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
स्वच्छता गरजेची
मुलांना नेहमी हात धुण्याची सवय लावावी. अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवावेत. तसेच टॉयलेटला जाऊन आल्यानंतरही हात, पाय साबण लावूनच धुण्यास लावून हायजीनचे महत्त्व पटवावे. हिवाळा आला की मुले अंघोळ करण्यास कंटाळा करतात. अनेक वेळा पालकही त्याकडे लक्ष देत नाहीत.
खेळ, व्यायाम अत्यंत आवश्यक
व्यायाम आणि खेळ केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सकाळच्या सूर्यप्रकाशात व्यायाम केल्याने शरीर बळकट होऊन रोगांशी लढण्यास मदत होते. पालकांनी मुलांना बरोबर घेऊन व्यायाम केल्यास त्यात सातत्य राहून मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. पुरेशी झोपही प्रतिकारशक्ती वाढविते.
हेदेखील वाचा : गरिब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची चिंता मिटली; केंद्र सरकारकडून ‘विद्यालक्ष्मी योजना जाहीर; काय आहे योजना?