शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा केला जात आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाअखेर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. यावेळी त्यांनी शेतीसाठी वीजपुरवठ्याचा कालावधीही वाढवण्याची घोषणा केली. सुरुवातीला शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कालावधी वाढवत १२ तास दिवसा वीजपुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंधार, वन्य प्राण्यांचा धोका, सर्पदंश आणि अपघात यांसारख्या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. दिवसा वीज उपलब्ध झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि शेतीची उत्पादकता वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवसा नियमित आणि पुरेशा कालावधीसाठी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास सिंचन अधिक सुलभ होईल, उत्पादन खर्चात बचत होईल आणि शेती अधिक सुरक्षित व कार्यक्षम बनण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने आता सर्व प्रकारच्या बियाणांचे प्रमाणीकरण (Seed Certification) डिजिटल संकेतस्थळाच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. या कडक निर्णयामुळे बाजारपेठेतील बनावट आणि बोगस बियाणांच्या विक्रीला पूर्णपणे बसेल आणि बळीराजाची फसवणूक थांबेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सुकर करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






