वाशीम : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) (Under Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project) (Pokra) विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. (Collector and Chairman of District Coordinating Committee Shanmugarajan S.) यांनी ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात (Wakataka Hall) आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा समन्वय समितीच्या सहअध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सचिव शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत योजनानिहाय राज्यस्तरावरील उपविभागनिहाय देण्यात आलेल्या गुणांकनावर चर्चा करण्यात आली. राज्यातील ३६ उपविभागामध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यस्तरावर गुणानुक्रमे वाशीम उपविभागाचा रॅंक ५ व्या क्रमांकावर आहे. पोक्रा प्रकल्पाच्या व्यक्तीगत लाभाचे घटक व प्रशिक्षण या घटकामध्ये सुधारणा केल्यास आपला उपविभाग वरच्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यासाठी वरील घटकांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. तसेच व्यक्तीगत लाभाच्या घटकांची मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर या तालुक्याची प्रगती समाधानकारक नसल्याने त्यासाठी पूर्वसंमती प्राप्त शेतकरी व शेतीविषयक साहित्य पुरवठादारांची एकत्रित कार्यशाळा घेण्याची सूचना उपस्थित सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना प्रकल्पाअंतर्गत व्यक्तिगत लाभ देण्यासाठी पोक्रा प्रकल्पातील गावातील ५ हेक्टर पर्यंतच्या पात्र लाभार्थ्याची संख्या ४०० हजार ५१५ असून ३३ हजार ९३९ शेतकऱ्याची डिबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. नोंदणीची टक्केवारी ८३.७७ टक्के इतकी आहे. पुढील एका महिन्यात ९० टक्के पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले. या सभेला पोक्रा प्रकल्पाच्या जिल्हा समन्वय समितीचे सदस्य पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गणेश पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक पी. टी. सरकटे, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. भारत गिते, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, लेखाधिकारी प्रशांत पुंडे, प्रकल्प कृषी विशेषज्ञ मिलिंद अरगडे तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.
सभेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सादरीकरण केले. या सभेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प विशेषज्ञ विश्वजित पाथरकर, प्रकल्प विशेषज्ञ ज्ञानेश्वर बुधवंत, प्रकल्प सहाय्यक राजकुमार खिल्लारी, प्रकल्प लेखा सहाय्यक राजेश बनचरे, राजेश कोकाटे, धीरेंद्र देवहंस व अविनाश चिल्लोरे यांनी परिश्रम घेतले.