
मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
मुंबई : देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला पण या स्वातंत्र्य चळवळीत ज्या शक्तींचा काडीचाही संबंध नाही त्याच शक्ती आज देशात व राज्यात सत्तेवर आहेत. या शक्ती संविधान मानत नाहीत व राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्ष विरोध केला. स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हता याबद्दल या शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधान स्विकारावे व संघाची नोंदणी करून संघाला देणगी कोण देते, याचा हिशोब देशाला द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ८० वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी प्रदेशाध्यक्षांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस गुरुचरणसिंग बच्छर, राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे, श्रद्धा ठाकूर, जोजो थॉमस आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशात आज संविधान व लोकशाहीला पायदळी तुडवत राज्यकारभार केला जात असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्यासाठी मोठा लढा सुरु केला आहे. आज देशात फक्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास दृढ होत चालला आहे, यात तरुणाईची संख्या सर्वात जास्त आहे. राहुल गांधी यांना विविध पद्धतीने त्रास देण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी घेतलेला वसा सोडला नाही. राहुल गांधी यांनी देशासाठी सुरु केलेले हे मिशन ही आजच्या काळाची गरज असून त्यांच्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आज ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आजही देशात जाती धर्मावरून भेदभाव केला जात आहे हे आपल्याला शोभणारे नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या रॅलीनंतर सत्ताधारी भाजपाच्या बदलबच्च्यांनी तथाकथीत शुद्धीकरण केले पण अद्याप या लोकांना अटक करण्यात आलेली नाही. देशात जाती धर्मावरून वातावरण बिघडवण्याचा सत्ताधारी लोकांचा प्रयत्न आहे पण त्यांचा हा डाव हाणून पाडू, संघ व भाजपाच्या विचाराला तिलांजली दिली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
चालू वर्ष हे संघटन बांधणीचे वर्ष असून राज्यात गाव पातळीवर ग्रामशाखा स्थापन करणे, सर्व मंडळ, ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष नियुक्त करण्याचा संकल्प आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
लाल किल्ल्यावरूनही खोटे बोल पण रेटून बोल
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आल्या पण मागील १२ वर्षात अशाच दिलेल्या घोषणांचे काय झाले, याचा विचार केला पाहिजे. लाल किल्ल्यावरूनही खोटी आश्वासने देऊन देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महिलांना आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची आधीपासूनची भूमिका आहे आणि २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व संमतीने मंजूर झाले आहे पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरून जनतेची दिशाभूल करणे थांबवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.