पुणेकरांची 'ई-चलन' कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला 'ब्रेक' (संग्रहित फोटो)
पुणे : वाहतूक पोलिसांकडून प्राधान्याने ‘ई-चलन मशीन’द्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईलाच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ब्रेक लावला असून, पोलिसांना फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सर्व ई-चलन मशीन वाहतूक मुख्यालयात जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालण्यासाठी ही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पुढील 31 ऑगस्टपर्यंत ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ या पद्धतीने वाहतूक पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून वाहनचालकांकडून चलन वसुली सोडून वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य द्यायचे आहे. वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाईत अडकून न पडता प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे स्पष्ट इशारा या आदेशानुसार देण्यात आला आहे.
काय आहे आदेशात?
प्रमुख चौक व रस्त्यांवर अंमलदारांची नेमणूक, कोणीही विभागात थांबणार नाही. सकाळी, सायंकाळी व रात्री वाहतूक पोलिस कोंडी असेल तोपर्यंत विभागातच राहतील.
उपायुक्तांनी हे करावे…
वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी सीसीटीव्हीच्या निगराणीत ड्रंक अॅड ड्राईव्ह कारवाईची ठिकाणे निश्चित करावीत. तेथे कारवाई करण्यापूर्वी अप्पर पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी. ड्रंक अँड ड्राईव्हत पुन्हा-पुन्हा तेच कर्मचारी नसावे. ही कारवाई बॉडी कॅमेरे लावूनच करावी. त्याशिवाय अचानक कारवाईच्या ठिकाणी ‘डमी डिक्वॉय’ पाठवून पडताळणी करावी.
फक्त वरिष्ठांना अधिकार
पोलिस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाचे अधिकारी जड वाहनांवरील कारवाई, नो एंट्री आणि इतर गंभीर वाहतूक नियमभंगांवर ई-चलनद्वारे कारवाई करू शकणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कारवाईकडेच असलेला कल बंद होऊन वाहतूक व्यवस्थापनावर केंद्रित होईल अशी अपेक्षा आहे.
हॉटस्पॉट निश्चित करा
वाहतूक कोंडीचे व अपघाताचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित करून सिग्नलच्या वेळेचा अभ्यास करावा. सिग्नल सिंक्रोनायझेशन, कॉर्नर पार्किंग, चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व कोंडीच्या ठिकाणी वाहने थांबण्यास प्रतिबंध यावर विशेष लक्ष द्यावे. सोबतच वाहतूक सुधारणा आराखडा तयार करावा.
सोमवारी, शुक्रवारी साप्ताहिक सुट्टीलाही मनाई
अप्पर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी कर्मचारी रस्त्यांवरच उभे राहतील याची काळजी घ्यावी. वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोमवारी आणि शुक्रवारी शहरात मोठी कोंडी होते, त्यामुळे या दिवशी कोणालाही सुट्टी देऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
गैरप्रकारांवर करडी नजर
सीसीटीव्ही तसेच आयसीसीसीच्या माध्यमातून वाहतूक कर्मचारी प्रत्यक्ष चौकात उपस्थित आहेत की नाही, हे पहावे. तसेच शहरात कुठे कोंडी असल्यास स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करतील. सोबतच वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून गैरप्रकार तर होत नाही ना हे सीसीटीव्ही व आयसीसीसीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे.
दोनशे नव्यांना प्रशिक्षण
वाहतूक विभागात सुमारे २०० नवप्रविष्ट अंमलदारांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पोलिस उपआयुक्त, वाहतूक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित वेळेत जड वाहनांचा शहरात प्रवेश होण्यापूर्वीच त्यांना थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

