प्रदेशाध्यक्ष होताच सपकाळ अॅक्शन मोडवर, उद्या बोलावली बैठक; काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय?
मुंबई : काँग्रेसने अखेर प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नाना पटोले यांच्या जागी ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहातील. बड्या चेहऱ्यांना संधी न देता काँग्रेसने महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबले आहे. प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र यांच्या ऐवजी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता तर मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप व कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड गणेश पाटील यांनी दिली आहे.
हर्षवर्धन सकपाळ यांचा राजकीय प्रवास
सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड पदवी घेतली आहे. ते शेतकरी कुटूंबातून आलेले आहेत.