फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व पक्ष तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा फटका बसल्यामुळे महायुतीदेखील मोर्चेबांधणी करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्लीमध्ये जाऊन कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. आता महाराष्ट्र काँग्रेस देखील तयारीला लागली आहे. कॉंग्रेसचा मेळावा लवकरच मुंबईमध्ये होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडणाप आहे. येत्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी रमेश चेन्निथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लीलोठीया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे उपस्थित राहणार आहेत.