ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर एका भरधाव कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये कंटेनरने दोन ते तीन दुचाकी, कार आणि टेम्पो या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी (वय ३१ ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य कासने (वय २४) , नशिर अली अबु अन्सारी (वय ३३) , जयेश बाळाराम सपाट (वय २५) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पडघा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर पडघा नजिक असलेल्या खडवली फाट्याजवळ कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विचित्र अपघाताची घटना कैद झाली. या सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसणारा भरधाव कंटेनर महामार्गावरून समोर असलेल्या कारला मागच्या बाजूस कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर चालकाने कारला फरफटत नेत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोलाही जोरदार धडक दिली. या अपघातात आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले.
या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार तसेच आईस्क्रीम टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या भीषण अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विचित्र अपघाताची चौकशी पडघा पोलीस करीत आहेत.