सचिन तेंडुलकरने राज ठाकरेंच्या घरी दिली भेट(फोटो-सोशल मीडिया)
Sachin Tendulkar visits Raj Thackeray’s house: राज्यातच नाही तर पूर्ण देशभर गणेशोत्सव सजरा केला जाता आहे. या उत्सवात अनेक दिग्गज एकमेकांच्या घरी भेट देऊन गणपतीची पूजा करताना दिसून येतात. यामध्ये राजकीय नेत्यांपासून ते क्रिकेट मधील मोठ्या खेळाडूंचा सहभाग दिसून येतो. अशातच भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह भेट दिली. यावेळी गणपती पूजा करण्यात आली. या दरम्यान सचिन तेंडुलकरकडून राज ठाकरे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेण्यात आली.
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचे नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. सचिनने देखील या गोष्टीला दुजोरा दिला. सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुनने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेव्ही ब्लू डिझायनर कुर्ता परिधान केलेला दिसून आला. तर त्याची पत्नी अंजली लाल साडी नेसलेली होती. गणपती दर्शनानंतर, तेंडुलकर कुटुंबाने ‘शिवतीर्थ’ येथील गणपतीच्या मूर्तीसमोर राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत फोटो देखील काढले.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला आहे. त्यांच्या घरी अनेक राजकीय आणि चित्रपट जगतातील मान्यवर दर्शनासाठी येत आहेत. सचिन तेंडुलकरच्या आधी बॉलीवूड अभिनेता आमिर खान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी आल्याचे दिसले आहे.
तेंडुलकरच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थिती दर्शवली. या दरम्यान त्यांनी गणपतीची पूजा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत लिहून माहिती दिली. त्यांनी लिहिले की, त्यांनी मुंबईतील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भगवान गणेशाचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले, सतेच सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना देखील केली.
हेही वाचा : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने आखले नवे प्लॅन! BCCI साठी पार पाडू शकतो ‘ही’ जबाबदारी
२० वर्षांनंतर शिवसेना-यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही देखील त्यांच्या कुटुंबासह चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती पूजा केली. गणपती उत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. राज ठाकरे यांचे म्हणणे मान्य करून उद्धव ठाकरे कुटुंबासह बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहचले.