फोटो सौजन्य- प्रतिनिधी
अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी मठातर्फे जेष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात जेष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी राज्यभरात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूरात ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शनिवारी अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी समर्थ चौकात अंबरनाथ मधील स्वामी भक्तांनी काळ्या फिती बांधून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी स्वामी समर्थ मानवविकास अध्यात्मिक केंद्रातील स्वामी भक्त बांधव, भगिनींनी एकत्र येत ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली.
स्वामी भक्तांनी दिला इशारा
“या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, महाराव यांनी राजकारणाच्या पातळीवर राजकारण करावं मात्र त्यांना आध्यात्म, संप्रदाय यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही, स्वामी समर्थ महाराज आमचं श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमानामुळे प्रत्येक स्वामी भक्ताच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे यापुढे जर असं घडलं तर स्वामी भक्त शांत बसणार नाहीत,” असा इशारा स्वामी भक्त दत्तात्रय केंगरे यांनी दिला. यावेळी अस्मिताई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त रामचंद्र कदम, हेमंत गायकवाड, दिनेश नलावडे, योगेश हातेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी समर्थ चौकात स्वामी भक्त निषेध करण्यासाठी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्रात स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तांनी स्वामीचे मठ उभारले आहेत. त्याठिकाणी भक्तांकडून सेवा करण्यात येते. लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याने सर्वच स्वामी भक्त दुखावले गेले आहेत. रत्नागिरीमध्येही या अगोदर त्यांचा निषेध करण्यात आला होता.