मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात दोन हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या (Active Corona Patients) पुढे गेल्याची माहिती समोर आली आहे. तर, मुंबईतही कोरोना रुग्ण आढळायला सुरुवात झाली असुन, गेल्या 24 तासांत मुंबईत 123 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बिएमसीच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
[read_also content=”अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार! तीन जणांमध्ये झालेल्या गोळीबारात दोघं गंभीर जखमी https://www.navarashtra.com/crime/two-seriously-injured-in-gunfire-between-three-people-at-firing-in-gurudwara-in-usa-nrps-378774.html”]
देशभरासह मुंबईतही कोरोना वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 123 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. तर, सध्यास्थितीत मुंबईत 43 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 21 रुग्ण व्हेंटिलटरवर आहेत.
बिएमसीने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 1,850 आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 30 खाटा आहेत. मात्र, कोरोना प्रादर्भाव वाढता तर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील.
दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाला लोक बळी पडत आहेत. पण नागरिकांना याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-19 आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात आलं आहे. मॉक ड्रीलच्या प्रोटोकॉलवरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. कशाप्रकारे मॉक ड्रील करायचं यासंदर्भात माहिती देणार आहेत.