मंचर : मंचर (ता .आंबेगाव) येथे अंगारिक चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी भाविकांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे अंगारक चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे महापूजा झाल्यानंतर अभिषेक संपन्न झाला. आरती होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून पावसाची रिपीरीप सुरू होती तरीही भाविक दर्शनासाठी येत होते.दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. येथील पेशवेकालीन पुरातन गणेश मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरापासून पायथ्यापर्यंत लाकडी बॅरिकेट लावून दर्शन रांग बनविण्यात आल्याने भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले. सकाळी मंचर येथील विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळाच्या वारकऱ्यांनी पारायण केले. भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढून दर्शन रांग लांबवर गेली.भर पावसात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते.