ईर्शाळवाडी – ईर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ईर्शाळवाडीवर (irshalwadi) कोसळलेल्या दरड दुर्घटनेतील मृतांच्या संख्या 22 वर पोहचलेली आहे. अद्यापही 105 जणांचा शोध लागलेला नाही. मंगळवारी रात्री या वाडीवर दरड कोसळली होती. त्यात 17 ते 18 घरांवर 15 फूट मातीचे ढइगारे कोसळलेले आहेत. या दुर्घटनेत 8 जण जखमी झालेले आहेत. ही वाडी अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यानं जेसीबी किंवा हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचू शकत नाहीये. त्यामुळे एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे जनाव भर पावसात आणि चिखलात श्वासनपथकाच्या मदतीनं हातानं हा मातीचा ढिगारा उपसत आहेत. आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून, या वाडीतील 105 जणांचा शोध घेण्यात येतो आहे.
वाडीतील ग्रामस्थांचं जवळच्या गावातील मंदिरात स्थलांतर
या वाडीतील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं असून, इर्शाळवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचायतन मंदिरात त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी या ग्रामस्थांना अन्न-धान्य पुरवण्यात येतंय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज त्यांची भेट घेणार आहेत.
कधी होणार पुनर्वसन
या ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर या वाडीतील रहिवाशांचं स्थलांतर आणि पुनर्वसन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पर्यायी पुनर्वसन जागेबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात हे कधी होईल, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.